कातरवेळ...


संध्याकाळी साडे सहाची वेळ. पाणी प्यायला जाता जाता अनपेक्षितपणे मनाच्या पटलावर 'भय इथले संपत नाही' चे मृदू सूर उमटले आणि तो चमकला. सकाळपासून ऑफिसच्या कामात स्वतःला गाडून घेतले होते त्याने. अगदी कशाची म्हणून शुद्ध नव्हती. अचानक असे काही होईल ह्याची त्याला काडीमात्र कल्पना नव्हती. कैक वर्षांपूर्वी दूरदर्शन वर लोकप्रिय असलेली 'महाश्वेता' मालिका डोळ्यांसमोर तरळली आणि लता दीदींचा मंजुळ स्वर कानात घुमला. तशी त्याची पावले थबकली.

लगोलग पाण्याची बाटली भरून पुन्हा कामाला लागण्याऐवजी तो Cafeteria मध्येच थांबला. खिशातून मोबाईल बाहेर काढून ते गाणे इंटरनेटवर शोधले आणि मोबाइल स्पीकर वर ठेऊन '...मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गिते...' ऐकत तिथेच आसनस्थ झाला. हातातला ग्रीन टी चा कप जागेवर थिजला आणि त्याचा चेहरा क्षणभर उजळला. येणारे जाणारे त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहात निघून जात होते, तो मात्र डोळे मिटून हरवलेला दूर कुठेतरी हरवलेला...

आयुष्य वाळूप्रमाणे हातातून भराभरा निसटून चालले आहे, खूप काही घडत आहे, सतत व्यस्त असूनही आयुष्यात कुठेतरी मोठ्ठी पोकळी निर्माण झाल्याचे त्याला प्रकर्षाने जाणवले. तसा त्याच्या पोटात गोळा आला. लतादीदींचा आर्त स्वर आणि गाण्याचे बोल - 

स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

जणू त्याच्या हृदयावर आघात करीत होते. आयुष्यात जवळपास सारे काही आहे पण तरीही '... मज तूझी आठवण येते' ऐकल्यावर आणखीनच कावराबावरा झाला तो. खोलवर आतून गलबलून आले आणि डोळ्यांच्या कडा आपसूकच पाणावल्या, अगदी किंचित. असे का बरे होत आहे? सर्व काही आलबेल असताना मन कोणाला शोधत आहे अन ते ही इतक्या आतुरतेने?

गाणे संपत आले होते आणि लतादीदी पुन्हा एकदा ध्रुवपद आळवत होत्या - 

भय इथले संपत नाही
मझ तूझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकवीली गिते

तत्क्षणी तो चमकला, ताडकन त्याचे डोळे उघडले. मनाच्या गाभाऱ्यात त्याने स्वतःलाच पहिले होते, एक दशकापूर्वीच्या स्वतःला, अगदी स्पष्टपणे. पूर्वीचा तो...उत्साही, आनंदी, उस्फुर्त आणि शांतचित्त. हृदयात कळ आली आणि त्याला उमजले नेमके जे हरवले आहे. त्याच्या चेहऱ्यावर उत्कट स्मितहास्य उमटले नि ती स्वतःशीच कुजबुजला - आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आल्यावरही 'भय इथले संपत नाही'. तेंव्हा या संध्याकाळी पूर्वीच्या 'तू मला शिकविली गीते' गायला काय हरकत आहे?

तसा तो लगोलग जागेवरून उठला, अगदी उस्फुर्तपणे. चेहऱ्यावर असीम नवंचैतन्य जणू काही पहिल्या पावसाची सर अनुभवत असलेल्या निष्पाप बालकाप्रमाणे झळकत होते. तो स्वतःशीच गुणगुणत पुन्हा जागेवर निघाला -

झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया
भय इथले संपत नाही
मझ तूझी आठवण येते...!

दूरवर कुठेतरी लतादीदी आणि 'पूर्वीचा तो' गालातल्या गालात हसत होते!



Comments

Post a Comment