तो, मी आणि इगो…!

खूप दिवस झाले मन अस्वस्थ होत होतं. दिवसातून एकदा तरी त्याचा विचार मनात यायचाच. त्याच्याशी जवळ जवळ वर्षभर बोललो नव्हतो. मग एके दिवशी लावला फोन आणि बोललो. तसा व्यवस्थित बोलला, अगदी formally कोणाशीही बोलावं तसं. का कुणास ठाऊक मी त्याच्या आवाजात मायेचा ओलावा शोधत होतो, पण तसं काही जाणवलं नाही. त्याला म्हणालो कैक दिवस आपलं बोलणं किंवा भेटणं झालाच नाही, तेंव्हा भेटू. तो म्हणाला सध्या परगावी चाललोय १५ दिवस. मग मी म्हणालो आलास की फोन कर, तो हो म्हणाला नि मी फोन ठेवला. फारशी आशा नव्हती पण कुठेतरी आतून वाटत होतं की करेल फोन. त्याला येऊन आता महिना झाला पण त्याचा फोन काही आला नाही.
एक मन उद्विग्न झाले की का नसेल केला त्याने फोन? तर दुसरे मन म्हणाले तुलाच नेहमी माघार घ्यायची काय गरज आहे? या हि वेळी तू तेच केलंस आणि त्यानेही. तू तुझ्या स्वभावाला धरून राहिलास, नाते टिकविण्याकरिता झालेले issues, गैरसमज, मनावरचे घाव आणि स्वाभिमान सोडून तू पुन्हा झुकलासच. अन त्याने नेहमीप्रमाणे, सख्खा भाऊ असून सुद्धा तुझ्या हाकेला साधी ओ देखील दिली नाही. तेंव्हा तूच विचार कर तुला कसे वागायचे आहे ते…
खरंच हल्ली कोणत्याही नात्यामध्ये 'मी' हा इतका महत्वाचा का आहे? मला काय वाटते किंबहुना मला जे वाटते तेच बरोबर आहे हा अट्टाहास का? कोणीच स्वतःला समोरच्याच्या जागी ठेऊन आता विचार करीत नाही की - अरे त्याच्याही काही अडचणी असू शकतील, काही कारणे असू शकतील अशा वागण्यामागे. उलट तो चुकला आहे, पण हे नाते टिकविण्याकरिता मीच त्याला माफ करतो आहे असा चुकीचा भाव मनी बाळगतात लोक. हल्लीच्या काळात आपल्याला फारसा वेळ नसतोच एकमेकांसाठी. तेंव्हा हे असे गैरसमज मनात धरून वर्षानुवर्षे एकमेकांशी साधा संपर्कही ना करणे चुकीचे नव्हे का? कोणताही प्रश्न एकमेकांशी बोलण्याने सामंजस्याने सोडवता येतोच, हे लोकांच्या विस्मरणात गेले आहे. त्या ऐवजी दुराभिमान बाळगून आपापल्यात कोशात स्वतःला गुरफटून घेत; जे मला दिसते, पटते तेवढेच जग आहे मानण्यात व्यस्त आहेत लोक.
अरे कोणीतरी काढा यांच्या डोळ्यावरची 'मी'पणाची पट्टी नि दाखवा याना स्वत्वापलीकडचे मोकळे नात्यांचे आकाश. त्यात भरलेले विविध नात्यांचे रंग, काही प्रफुल्लित करणारे तर काही उदासीन असतील. पण गैरसमजाचे मळभ दाटलेल्या आभाळापलीकडे प्रेमाचा तेजस्वी सूर्य अखंड तळपतो आहे अगदी स्वच्छ मनाने. तेंव्हा मनावरचे मळभ दूर करून तर बघा, समोरच्या व्यक्तीसाठी, तुमच्या नात्यासाठी दोन पावले पुढे जाऊन तर बघा, आज ना उद्या ती व्यक्तीही तेच करेल. कोणत्याही दोन व्यक्ती ह्या वेगळ्या असणारच, वेगळा विचार करणारच, पण म्हणून नात्यांची नाळ लगेच तोडून टाकावी का? दोन व्यक्ती एकत्र आल्या की त्यांचा स्वतःचा असा विचार असणारच, त्या व्यक्ती-स्वातंत्र्याचा आदर नक्कीच करावा. पण जेंव्हा दोघांशी निगडित काही निर्णय घ्यायचा असेल, तेंव्हा दोन्ही व्यक्तींनी मोकळेपणाने बोलून सामंजस्याने निर्णय घेणेच जास्त संयुक्तिक आहे, नाही का?
हि पोस्ट वाचत इथवर पोचला असालच, तर तुमच्या सर्व नातेसंबंधांची मनात उजळणी करा, तुमच्या मोबाइल मधले सारे कॉन्टॅक्टस चाळून काढा . कित्येक दिवस, महिने, वर्षे न ठोठावलेली मैत्रीची दारे धुंडाळा. नि द्या बिनधास्तपणे मनमोकळी धडक, बघा मैत्रीच्या झऱ्याला पाझर फुटतो की नाही ते.
- तुमच्यामधलाच एक.... चिवित्र…!🙂🙂🙂

Comments