।। उस्फुर्त ।।

काय लिहावं बरं? खूप दिवस झाले चिवित्रयानवर काही विचार मांडून. सतत वाटतं की तुम्ही हे page like केले आहे म्हणजे तुमच्याकरिता काहीतरी पोस्ट करणे हे तर माझे प्रथम कर्तव्यच आहे ना! परंतु मी काही script-writer नाही, आणि म्हणूनच मला ठरवून लिहिता येत नाही. मी बापडा, सरळ, साधा आणि मुख्य म्हणजे मनस्वी माणूस. बापरे जास्तच होतंय का जरा?  पण मनस्वीपणा तनामनात रुजलेला. आणि म्हणूनच मनाला काही भावलं, रुचलं आणि तुमच्यासमोर मांडावे तरच बोट चालतात माझी.
हो बोट चालतात असंच म्हणालो मी. आता लेखणी झरते, शब्द कागदावर आपोआप उतरू लागतात वगैरे अलंकारीक लिहिताच येत नाही. सगळा संगणकावरील बटणांचा खेळ. वळणदार हस्ताक्षर लोप पावले अगदीच. इतक्यात कोणी कोणाला स्वतःच्या हाताने पूर्वीप्रमाणे पत्रं लिहिल्याचे ऐकिवात नाही. पूर्वी कसे अक्षरावरूनच ओळख पटायची, ती पत्रं अक्षरश: काळजाशी धरता यायची. आपुलकीचा सुगंध असायचा पत्रांना. लिखाणाच्या पद्धत, टापटीप, अक्षराचे वळण वगैरे घटकांवरून पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीच्या भावनांचा पक्का अंदाज बांधता यायचा. आता मात्र नुसतीच बटणांची टकटक, किंबहुना touchpad असल्यामुळे ते ही नाही. अक्षर पठडीतले (कारण system सर्वांना एकाच पारड्यात तोलते, सगळे एकाच चाकोरीत गणले जातात. यांत्रिकीकरणाचे असेही दुष्परिणाम होतील असे कधी स्वप्नातदेखील वाटले नव्हते बुवा.
आता हाच विषय घ्या. पूर्वी माणसे माणसांशी बोलायची, चेहऱ्यावरून मनातली सुखदुःख ओळखायची. कधी पाठीवर थाप पडत असे, तर कधी थेट गळाभेट. माणूस माणसाला भेटायचा. खूप दिवस भेट झाली नाही तर एकमेकांना पाहण्याकरिता एकत्र यायची, संवाद व्हायचा थेट हृदयाचा हृदयाशी. आता तंत्रज्ञानातं प्रचंड सुधारणा झाली बदल झाले. शेकडो मैल दूर असणारी माणसे जवळ आली (किंबहुना नुसताच असा ग्रह झाला), २४ तास संपर्क लागला. संवादाची जागा messages नी घेतली. नेमकी इथेच माशी शिंकली. तुम्ही तुमचा message कधीही पाठवू शकता. संवादाकरिता दुसरी व्यक्ती समोर असण्याची, जागी असण्याचीही गरज संपली. संवादातला भावना संपली, उरले केवळ शब्द. होय नुसतेच शब्द, अर्थहीन, पूर्वीसारखा जोश वा ताकद नसलेले. दुसऱ्या बाजूला पोचतात ते अगदी बिनदिक्कत. पण भावना पोचत नाही. नुसताच कनेक्टेड असण्याचा भ्रम. सतत कॉन्टॅक्ट मधे आहोत आपण, पण मित्र/मैत्रिणीच्या मनाची नेमकी अवस्था आहे हे कळण्याचा काहीच मार्ग नाही. कारण शब्दांना आता आवाजाची जोड नाही.
हे मी केवळ माझ्यापुरतेच लिहितो आहे का हो? अर्थातच नाही, तेंव्हा थोडावेळ लॅपटॉप/मोबाईल (जे काही हातात असेल ते) थोडावेळ बाजूला सारा, बसल्याजागी डोळे मिटून खोल श्वास घ्या आणि हळुवार सोडा. प्रत्येक श्वासागणिक मनातला सारा गोंधळ, सारे व्याप काही काळापुरते बाजूला सारा. आणि आठवा ती शेवटची वेळ जेंव्हा तुम्ही तुमच्या आप्तजनांसोबत खऱ्याखुऱ्या मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि दिलखुलासपणे हसलात. WhatsApp किंवा तत्सम social network प्लॅटफॉर्म वर नव्हे बरं का... तर शक्यतो एकमेकांसोबत बसून, अगदीच शक्य नसेल तर किमान फोनवर एकमेकांचा आवाज ऐकून. आठवतंय? खुप वेळ झाला का हो अशा मनोभावे संवादाला? शेवटी संवाद म्हणजे ह्या हृदयीचे त्या हृदयी घालणे, एकमेकांच्या मनीची भावना न सांगता समजणे. आणि हे केवळ व्यक्तिगत भेट अथवा संवादानेच शक्य आहे.
मग लगेच कामाला लागा, अशा सर्वांची यादी करा. त्यांना कॉल करा, भेटण्याचे प्लॅन्स करायला घ्या... शेवटी वेळेला कैक हजारांचा मोबाईल फोन पाहून तुम्हाला आनंद होणार नाही पण लाडक्या मित्राचा/ आप्तेष्टांचा चेहरा पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच किमान स्मितहास्य झळकाल्याशिवाय राहणार नाही.
आनंद द्या आणि आनंद घ्या... आनंदी रहा!
।। चिवित्रयान ।।

Comments